ताथवडे येथील “जुबेर मुजावर” खुन प्रकरणी अल्पवयीन आरोपी अटकेत

0
573

ताथवडे, दि. २९ (पीसीबी) – दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने जुबेर गुलाव मुजावर (वय १९, रा. सपकाळ चाळ, सोनवणे वस्ती, ताथवडे) या तरुणाच्या डोक्यात दगड मारुन तसेच तलावारीने वार करुन खून केल्याचे उघड झाले आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा तपास लावत ताथवडे सोनावणे वस्ती येथे रहणाऱ्या अल्पवयीन आरोपीस अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  जुबेर आणि १७ वर्षीय अल्पवयीन आरोपी हे मित्र होते. ते नेहमी दारू पिण्यासाठी ताथवडे बालाजी कॉलेज कडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर बसायचे. गुरुवारी रात्री देखील ते तीथे दारु पिण्यासाठी बसले होते. यावेळी आरोपी आणि जुबेर या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. यामुळे रागाच्या भरात मुजावर याने अल्पवयीन आरोपीवर तलवार उघारली. यावर आरोपीने दगडाने जुबरेला मारहाण केली. त्यानंतर त्याचीच तलवार हिसकावून त्याच्या पोटावर, मानेवर आणि डोक्या वार करुन त्याचा खून केला आणि पसार झाला.

आज शुक्रवारी सकाळी वाकड पोलिसांना ताथवडे बालाजी कॉलेज कडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर एक तरुण बेशुध्द अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता जुबेर हा जखमी आवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. दरम्यान या खूनातील आरोपी हा रावेत परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.