‘तळेगाव सोमाटणे टोल नाका बंद होणार?’ :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः घातले लक्ष

0
294

मुंबई, दि.१७ (पीसीबी) : तळेगावच्या सोमाटणे भागातील विविध पक्षांचे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. सोमाटन्यातील टोल नाका बंद करावा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर भेट घेतली. 21 तारखेला उग्र आंदोलन करणार असल्याची माहितीही या सदस्यांनी दिली.

राज ठाकरे यांनी आयआरबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला आणि उद्यापर्यंत माहिती देण्यास सांगितले. गेली 15 वर्ष सोमाटणे भागातील स्थानिक रहिवाशी टोलनाका बंद करण्याची मागणी करत आहेत. पण कंत्राट 11 वर्षांसाठी दिल्याचं सांगत प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप आहे.

कोरोना काळात पुन्हा एकदा नवे कंत्राट देण्यात आले आणि ते आयआरबीने जिंकले. त्यामुळे हा टोलनाका बंद करा या मागणीसाठी नागरिकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

रुपाली पाटील यांची टोलनाक्यावर वादावादी –
मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांची नुकतीच किणी टोल नाक्यावर फास्टॅगवरुन वादावादी झाली. रात्री साडे नऊ दहाच्या सुमारास रुपाली पाटील पुण्याच्या दिशेनं निघाल्या होत्या त्यावेळी किणी टोल नाक्यावर ही वादावादी झाली. या संपूर्ण घटनेचं फेसबुक लाईव्ह करण्यात आलं आहे.

फास्टॅग लागू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक होते. त्यावेळी रुपाली पाटील किणी टोल नाक्यावरुन पुण्याच्या दिशेनं निघाल्या होत्या. पण टोन नाक्यावर प्रचंड मोठी रांग लागली होती. त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे रुपाली पाटील ठोंबरे यांनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी थोडी वादावादी झाल्याचंही पाहायला मिळालं. तेव्हा रुपाली पाटील यांच्या मदतीला टोल नाक्यावरील अन्य वाहन चालकही आल्याचं पाहायला मिळालं.