तळेगांव दाभाडेत भरदिवसा बंद बंगला फोडला; ४ लाखांच्या सोन्या, चांदीच्या दागिन्यांवर डल्ला

0
444

तळेगांव दाभाडे, दि. २५ (पीसीबी) – येथील ज्येष्ठ पत्रकार सुनील वाळुंज यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून भरदिवसा चोरट्यांनी पावने चार लाखांच्या सोन्या,चांदीच्या दागिन्यावर डल्ला मारला. चोरट्यांनी ३ लाख ७५ हजार रूपयांचे सोने, चांदी व रोख रक्कम लंपास केली. ही घटना आज (शनिवार) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. 

याप्रकरणी सुनील वाळुंज यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी वाळुंज यांचे कुटुंबीय विवाहानिमित्त बाहेरगावी गेले होते. तर वाळुंज  सकाळी १० वाजता काही महत्त्वाच्या कामासाठी कामशेत येथे गेले होते. परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला.

चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवण्यात आलेले सुमारे ७ तोळ्यांचे सोन्यांचे दागिने, तर पिशवीतील सव्वा दोन किलो वजनाची चांदीची भांडी व रोख रक्कम असा सुमारे ३ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला.

अधिक तपास तळेगांव पोलिस ठाण्याचे गुन्हे अन्वेशन शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार करत आहेत.