तळवडेमध्ये इलेक्शन ड्यूटीवर गैरहजर असलेल्या महिलेला फोन केल्याने बुथ लेवल ऑफिसरला मारहाण

0
484

तळवडे, दि २८ (पीसीबी) – इलेक्शन ड्यूटीवर गैरहजर असल्याने फोन करून विचारणा केल्याने दोन जणांनी मिळून मुख्याध्यापक तथा बुथ लेवल ऑफिसरला केबिनमध्ये घुसून शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि.२७) दुपारी एकच्या सुमारास  तळवडे येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिरमध्ये घडली.

याप्रकरणी एकनाथ सोपानराव आंबवले (वय ४५, रा. श्रद्धा पार्क, कृष्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार , अनिल बाबू जाधव (वय २२, रा. स्वामी विवेकानंद नगर, वाल्हेकर वाडी, चिंचवड) आणि रिषा मल्लेश चव्हाण (वय २४, रा. शिवाजी चौक, वाल्हेकर वाडी, चिंचवड) यांना दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ आंबवले हे नवनगर शिक्षण मंडळाच्या तळवडे येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर मध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे सध्या त्यांना बुथ लेवल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले आहे. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास सीमा भिल्ला राठोड या निवडणुकीच्या ड्यूटीवर गैरहजर असल्याने मुख्याध्यापक आंबवले यांनी त्यांना फोन केला. यावरून अनिल जाधव आणि रिषा चव्हाण हे दोघे शाळेत आले. त्यांनी केबिनमध्ये घुसून एकनाथ यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच फ्लॉवरपॉट फेकून मारला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.