…तर, भारत, न्यूझीलंड ठरणार संयुक्त विजेते

0
465

दुबई, दि.२८ (पीसीबी) : पहिल्या वहिल्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अनिर्णीत किंवा टाय राहिला, तर अशा परिस्थितीत भारत आणि न्यूझीलंड यांना संयुक्त विजेते निश्चित करण्यात येईल. अंतिम सामन्याच्या एकूण स्वरुपाची माहिती आज आयसीसीने जाहिर केली. त्यानुसार सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते धरण्यात येईल. त्याचबरोबर नियोजित पाच दिवसात काही कारणामुळे खेळात नैसर्गिक व्यत्यय आल्यास सामना राखीव दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी खेळविण्यात येईल. अंतिम सामना १८ ते २३ जुलै दरम्यान होणार आहे.

नैसर्गिक आपत्तीने सामन्याचा एखादा दिवस वाया गेला किंवा रोजच्या दिवसातल्या खेळाचे काही तास वाया गेले आणि हा वाया गेलेला वेळ रोजच्या वाढीव वेळेतून भरून येऊ शकत नसले,तरच राखीव दिवसाचा वापर केला जाणार आहे. पाच दिवसांनंतरही सामन्याचा निर्णय लागत नाही, म्हणून राखीव दिवसाचा वापर करता येणार नाही. पाचव्या दिवस अखेरीसही निकाल लागला नाही, तर सामना अनिर्णित घोषित केला जाईल, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.

सामन्या दरम्यान खेळाचा वेळ वाया गेला, तर त्या संदर्भात आयसीसी निरीक्षक सातत्याने दोन्ही संघांच्यासंपर्कात राहतील आणि त्यांना राखीव दिवसांचा वापर करता येईल की नाही याबाबत सूचना करतील. सामन्यात राखीव दिवसाचा वापर करायचा की नाही याचा निर्णय सामन्याच्या पाचव्या दिवसाचा एक तासाचा खेळ शिल्लक असताना जाहिर केला जाईल. अंतिम सामन्यात अव्वल दर्जाच्या ड्यूक चेंडूंचा वापर करण्यात येईल अर्थात, भारत मायदेशात खेळताना एसजी, तर न्यूझीलंड कुकाबुरा चेंडूंचा वापर करते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या खेळ पद्धतीत आयसीसीने काही बदल केले आहेत. ते पुढील प्रमाणे…

शॉर्ट रन – तिसरा पंच शॉर्ट रन बाबत थेट निर्णय घेईल आणि त्या संदर्भात मैदानावरील पंचांना पुढील चेंडू टाकण्यापूर्वी ते सूचित करतील.

प्लेअयर रिव्ह्यू – पायचितच्या निर्णयाविरुद्ध रिव्ह्यू घेताना पंच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार आणि बाद झालेला फलंदाज यांच्याकडे विचारणा करतील.

डीआरएस रिव्ह्यू – पायचितच्या निर्णयासाठी यष्ट्यांच्यावरून जाणाऱ्या चेंडूंची अट शिथिल करण्यात आली आहे. त्याच वेळी यष्ट्यांच्या वरून आणि बाजूने जाणाऱ्या चेंडूची उंची अंपायर्स कॉलसाठी कायम ठेवण्यात आली आहे.