तरुणाला दांडक्याने मारहाण करत हिसकावला मोबाईल फोन आणि…

0
473

चाकण, दि.१४ (पीसीबी) : दुचाकीवरून जात असलेल्या एका व्यक्तीला दांडक्याने मारहाण करून मोबाईल फोन तीन जणांनी मिळून जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 11) रात्री एमआयडीसी रोड, म्हाळुंगे येथे घडली.

अशोक बाळासाहेब येळवंडे (वय 36, रा. डोंगरेवस्ती, निघोजे) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी येळवंडे यांचे किराणा मालाचे दुकान आहे. गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास ते कामानिमित्त दुचाकीवरून जात होते. एमआयडीसी रोडवर म्हाळुंगे येथे व्हेरॉक कंपनी जवळ आल्यानंतर त्यांच्या मागून एक दुचाकी आली. दुचाकीवर तिघेजण होते.

मागून आलेल्या दुचाकीवरील तिघांनी मिळून येळवंडे यांना लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर येळवंडे यांच्या खिशातून 18 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.