तडीपार आरोपीला पिस्टलसह अटक

0
552

देहुरोड, दि. 10 (पीसीबी) : पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी कोणतीही परवानगी न घेता शहराच्या हद्दीत आला. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने त्याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शनिवारी (दि. 9) रावेत येथे करण्यात आली.

करण रतन रोकडे (वय 23, रा. रोकडेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई शुभम कदम यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करण रोकडे याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शासनाची कोणतीही परवानगी न घेता शहराच्या हद्दीत आला. याबाबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला  शनिवारी दुपारी पावणे पाच वाजताच्या सुमारास रावेत येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा आणि कार असा एकूण बारा लाख 41 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.