तंबाखू पासून कोरोना लस

0
350

मुंबई, दि. ३०(पीसीबी) : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असताना काही देशांकडून कोरोनावर लस बनवल्याचा दावा केला जात आहे. आता थायलंडच्या शास्त्रज्ञांनी तंबाखूच्या पानांचा वापर करून कोविड 19 वरील लस विकसित केल्याचा दावा केला आहे. थायलंडच्या चुलालोंगकॉन विद्यापीठाच्या संसर्गजन्य आजारावर विख्यात असणाऱ्या डॉक्टरांनी जाहीर केले आहे की, स्थानिक पातळीवर निर्माण तयार करण्यात आलेल्या या लसीची माकडावर करण्यात आलेली प्राथमिक चाचणी यशस्वी झाली आहे.

थाई रेडक्रॉस संसर्गजन्य रोग आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. तिरावत हेमाचुडा यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, व्हायरसच्या डीएनएचे तंबाखूच्या पानात एकत्रिकरण करून ही नवीन लस तयार केली जाते. त्या डीएनएला झाडाकडून योग्य तो प्रतिसाद मिळतो आणि एका आठवड्यानंतर प्रथिने तयार होतात, असे बँकॉक पोस्टच्या अहवालात म्हटलं आहे.

नंतर लस तयार करण्यासाठी त्या प्रथिनांचा अर्क काढून घेण्यात येतो. आत्तापर्यंत या लसीचा वापर उंदीर आणि माकडांवर करण्यात आला आहे. मनुष्यावर चाचणी ही त्याच्या पुढची पायरी असेल, असं त्यांनी सांगितलं आहे. विशिष्ट प्रकारच्या तंबाखूच्या पानांच्या प्रथिनांपासून बनलेली ही लस अगदी औद्योगिक स्तरावरही उत्पादित करणे सोपे आणि स्वस्त आहे. तसेच याच्या पेटंटसंदर्भात कोणतीही समस्या येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे बँकॉक पोस्टने म्हटले आहे.

जगभरात कोरोनावर यशस्वी लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्या लसींचं क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. डब्लूएचओ ने दिलेल्या माहितीनुसार, 100 हून अधिक वॅक्सिन तयार करण्याचं काम सुरु आहे. ज्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, इज्राइल, चीन, रशिया, भारत यांसारख्या देशांचा समावेश आहे. भारतात कोरोना व्हायरस वॅक्सिनचं ह्युमन ट्रायल सुरु आहे. हे वॅक्सिन सध्या दुसऱ्या स्टेजमध्ये आहे.