डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन

0
313

संशोधक, संत साहित्याचे आणि लोकवाङ्मयाचे व्यासंगीअभ्यासक, व्याख्याते, प्रवचनकार निवर्तल्याची हळहळ

पुणे, दि. २६ (पीसीबी) – मराठी लेखक, संशोधक, संत साहित्याचे आणि लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक, व्याख्याते, प्रवचनकार आणि भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे आज संध्याकाळी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. सायंकाळी घरी पूजा करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.

डॉ.देखणे यांनी संत साहित्यावर विविध ५० वर विविध पुस्तके लिहिली आहेत. डॉ. रामचंद्र देखणे हे उत्तम वक्ते होते. त्यांनी गेल्या काही वर्षांत विविध विषयांवर अनेक व्याख्याने दिली. देशविदेशांत त्यांनी केलेल्या 2100 व्या भारुडाचा कार्यक्रम 14 मे 2019 रोजी झाला होता. रामचंद्र देखणे हे पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी होते. 34 वर्षांच्या नोकरीनंतर ते 2014 मध्ये निवृत्त झाले.

रामचंद्र अनंत देखणे (जन्म : एप्रिल १९५६) यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा होती. वडिलांच्या कीर्तनात ते लहानपणी अजाणतेपणी टाळकरी म्हणून उभे रहात आणि खड्या आवाजात अभंगातली चरणे म्हणत. त्यामुळे कीर्तन, प्रवचन, भजन आणि भारूड या कला प्रकारांशी ते आपोआप जोडले गेले. गावच्या जत्रेत किंवा पालखी, दिंडी सोहळ्यात रामचंद्र देखणे वेगवेगळी सोंगे आणून भारुडे करू लागले.

रामचंद्र देखणे हे जरी भारुडांत रंगून जात पण त्यांच्या अर्थाकडे त्यांचे लक्ष नसे. आई जेव्हा भारुडातील ’दादला नको गं बाई’ किंवा, ’नणदेचं कार्टं किरकिर करतंय’ आदी प्रतीकांचा अर्थ विचारू लागली तेव्हा त्यांनी भारुडांवर संशोधन करायला सुरुवात केली.