डांगे चौकात वाहतुक पोलिसाला शिवीगाळ करुन धमकावल्याने दोघांना अटक

0
393

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – नो एन्ट्रीमध्ये जाण्यापासून रोखल्याने कारमधील दोघांनी मिळून वाहतुक पोलिसाला शिवीगाळ करत नोकरी घालवण्याची धमकी दिली. यामुळे कारचालक आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि.३०) रात्री साडेदहाच्या सुमारास डांगे चौकात घडली.

राहुल शशिकांत जगदाळे (वय ३९, रा. ए ५१३, वर्धमान वाटिका, सेक्टर क्र. २७/२ बी, थेरगाव) आणि राहुल अर्जुन माने (वय २९, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई महेश शंकर भोर यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस शिपाई महेश भोर हे रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास डांगे चौकात वाहतुक नियमन करत होते. यावेळी आरोपी राहुल जगदाळे आणि त्याचा मित्र राहुल माने हे दोघे कार (क्र.एमएच/१४/डीएक्स/०७५९) मधून डांगे चौकाकडून पुनावळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंदी असताना देखील त्या रस्त्याने कारने जात होते. यावेळी तेथे वाहतुकीचे नियमन करणारे पोलीस शिपाई महेश यांनी त्यांची कार रोखली. कार रोखल्याचा राग आल्याने आरोपींनी महेश यांना शिवीगाळ करुन नोकरी घालवण्याची धमकी देत अंगावर धावून गेले. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रणवरे अधिक तपास करत आहेत.