ठरलं… शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीतून, दोन दिवसांत थेट उमेदवारीची घोषणा

0
484

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकित शिरूर मतदारसंघ महाआघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव जाहीर झाले, पण महायुतीत जागा कोणाकडे आणि उमेदवार कोण या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. महायुतीत ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे देण्यात आली असून तिथे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच असणार असेही निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः त्यांचा एक उमेदवार म्हणजेच आढळराव पाटील राष्ट्रवादीला देणार असून दोन दिवसांत ते स्वतःच त्याबाबतची घोषणा करणार आहेत. आता आढळराव यांचा शिंदेंच्या शिवसेनेतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश हा विषय शिल्लक राहिलेला नाही. दरम्यान, स्वतः आढळराव पाटील यांनी त्याबाबत पीसीबी टुडे प्रतिनिधीशी बोलताना या माहितीला दुजोरा दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर हे दोन्ही मतदारसंघ अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे, पुणे शहर भाजपकडे आणि मावळ लोकसभा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे असे महायुतीचे जागावाटप निश्चित झाले आहे. राज्यातील ४८ जागांचे सर्व वाटप निश्चित झाले असून भाजपने आपल्या २० उमेदवारींची नावे बुधवारी जाहीर केली आहेत. आता शिंदे आणि अजित पवार यांच्या वाट्याला ज्या जागा आहेत त्यातील मतदारसंघ आणि उमेदवारांची नावे दोन दिवसांत जाहीर होणार आहेत.

बारामतीमधून महाआघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीमधून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी प्रचारालाही सुरवात केली आहे. मावळ लसोकसभा मतदारसंघातून महायुतीचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात महाआघाडीकडून ठाकरेंच्या शिवेसनेची उमेदवारी माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांना मिळाली आहे. पुणे शहरात भाजपाने माजी महापौर मुरली मोहळ यांचे नाव काल जाहीर केले असून त्यांच्या विरोधात महाआघाडीचे उमेदवार म्हणून कसब्याच्या पोटनिवडणुकित इतिहास घडविणारे आमदार रविंद्र धंगेकर यांचे नाव जवळपास निश्चित आहे.

शिरूर लोकसभा हा अत्यंत चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्या बरोबर राहिले. अजित पवार यांना त्याचा राग असल्याने कोल्हे यांना पाडणारच असा विडा खुद्द अजित पवार यांनीच उचलला आहे. पाच वर्षांत लोकसंपर्क नसल्याने कोल्हे यांच्या विरोधात लोकभावना तीव्र आहे. कोल्हे हे उत्कृष्ट अभिनेते, वक्ते, अभ्यासू खासदार आहेत मात्र, निवडूण गेल्यावर पुन्हा ते भेटलेच नाहीत, अशी मतदराची तक्रार आहे. दरम्यान, २०१९ मध्ये सलग तीन वेळा लाखोंच्या मताधिक्याने निवडूक जिंकणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा डॉ. कोल्हे यांनी लिलया परावभ केला. आता त्याच अपमानाचा बदला घेण्याची संधी म्हणून आढळराव मोठ्या जिद्दीने रिंगणात उतरले असून गेल्या दोन महिन्यांत त्यांनी पूर्ण मतदारसंघ दोन वेळा पिंजून काढला. कोल्हेंचा पराभव करणारच असा निश्चय करून आढळराव प्रचाराला जुंपलेत. जागा शिंदे गटाच्या एवजी अजित पवार यांच्याकडे गेली. अशा वेळी कोल्हे यांचा पाडाव करायचाच तर तोडिस तोड उमेदवार म्हणून एकमेव आढळराव यांचेच नाव प्रबळ दावेदार म्हणून घेतले जाते. मुख्यमंत्री शिंदे आणि स्वतः अजित पवार यांनी त्यावर सविस्तर चर्चा करून सामोपचाराने मार्ग काढला. नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी आढळराव यांनी सर्वांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. डॉ. कोल्हे हे त्यांच्या छत्रपती संभाजी राजे या नाट्य प्रयोगातून लोकांना आवाहन करत आहेत, तर आढळराव हे गावोगावच्या सरपंच, उपसरपंच, महायुतीमधील सर्व पक्षांचे पदाधिकाऱ्यांच्या भेटीत गुंतले आहेत.