टीडीआर घोटाळा प्रकरणात अखेर संबंधित बांधकामाला प्रशासनाने दिली स्थगिती

0
88

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – वाकड येथील भ्रष्टाचाराचे आराेप झालेल्या टीडीआर प्रकरणात अखेर संबंधित बांधकामाला प्रशासनाने स्थगिती आदेश दिला आहे. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बांधकाम न करण्याचे आदेश महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी विकसकाला दिले आहेत.

महापालिकेतील कथित टीडीआर घोटाळा नागपूर हिवाळी अधिवेशनापासून गाजत आहे. विरोधी नेते विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशनात अडीच हजार कोटींच्या टीडीआर घोटाळ्याचा गौप्यस्फोट केला होता.

नियमबाह्य व बेकायदेशीर प्रक्रिया केल्याचा आराेप यामध्ये झाला. वाकड येथील स.न.१२२ येथील विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक ४ /३८ ट्रक टर्मिनस(काही भाग) व ४/३८A पीएमपी डेपो या आरक्षणासाठी १०,२७४ चौरस मीटर क्षेत्र समावेशक आरक्षणाच्या तरतुदी अंतर्गतविकसित करण्याचा हा प्रकल्प होता. मात्र, या प्रक्रियेवर आक्षेप घेत संबधित विकसक संस्थेला ज्यादा टीडीआर देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होता. त्यामुळे विकासकाला दिलेला टीडीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस, आम आदमी यासह विविध सामाजिक संघटनांनी आंदाेलन केले हाेते.

दरम्यान, शहर अभियंता निकम यांनी संबधित विकसक मे. विलास जावडेकर इन्फिनिटी या संस्थेला पत्र पाठवले. आहे. आयुक्तांनी समावेशक आरक्षणे विकसित करण्याच्या बैठकीत दिलेली मान्यता व करारनामा झालेला आहे. त्यानुसार काम सुरू आहे. परंतु, त्यानंतर 10 जानेवारी 2024 रोजी झालेल्या बैठकीत या प्रकल्पास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुढील आदेशापर्यंत थांबवावे, असे निकम यांनी नमूद केले आहे.