झेप पुनर्वसन केंद्र, पिंपरी या संस्थेचे 15वे वार्षिक स्नेहसंमेलन

0
178

पिंपरी दि. 11(पीसीबी) –  पिंपरी येथील झेप पुनर्वसन केंद्र या विशेष मुलांच्या संस्थेचे 15वे वार्षिक स्नेहसंमेलन मैत्री या विषयावर आधारित विविध सादरीकरणांतूनसोमवार, दि. 10 एप्रिल 2023 रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात उत्साहात पार पडले.

ज्यामध्ये मुलांनी विविध स्तरातील मैत्रीचे स्वरूप दाखविण्याचं प्रयत्न केला. मैत्री ही फक्त मित्र-मैत्रिणींचेच नव्हे तर ती शाळेशी, निसर्गाशी, प्राण्यांशी देवाशी तसेच ती वडील आणि मुलीची सुद्धा असते हे दाखवले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आयुक्त शेखर सिंग, पद्मश्री गिरीष प्रभुणे, माजी शासकीय सेवाधिकारी नंदकुमार फुले तसेच अश्विनीताई चिंचवडे, सिटीप्राईड शाळा प्राचार्य अश्विनीताई चिंचवडे, मा. नामदे इत्यादी मान्यवरांनी विशेष उपस्थिती दर्शविली.

संस्थेच्या संस्थापिका नेत्राताई पाटकर यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
पुढे मैत्री या विषयावर नृत्य- गायन- वादन तसेच पोवाडा अशा वेगवेगळ्या सादरीकरणांत जवळपास 120 मुले सहभागी झाली होती. तर, काही पालकांनी उत्स्फूर्त मनोगत व्यक्त करत आपले संस्थेसोबतचे चांगले अनुभव सांगितले.

पोवाडा, मुलांचा सर्वतोपरी सहभाग असणारा सांगितिक मेजवानीचा आॅर्केस्ट्रा अशा सर्वच कार्यक्रमांना पाहुण्यांनी खूप छान दाद दिली आणि त्यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले आणि खास उल्लेख करायचा तर, आयुक्त शेखर सिंग यांनी “22 डिसॅबलिटिज् ना समाविष्ट करुन झेपसोबत डिसॅबिलिटी सेंटर सुरु करुन बालवडी केंद्रात early intervention करुन मुलांना वेळेत थेरपी उपलब्ध करु” असे मत व्यक्त केले.

मा. नंदकुमार फुले सरांनी 18 वर्षांवरील मुलांच्या कायदेशीर पालकत्वाविषयी व कायदेशीर इतर तरतुदींविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.आणि पद्मश्री प्रभुणे सरांनी “उत्तम कारागिराच्या हातून सुंदर शिल्प जसे तयार होते तसे झेप म्हणजे या मुलांसाठी एक सुंदर नंदनवनात तयार व्हावे असे म्हणत जणू एक प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले”.

संस्थापिका नेत्राताई पाटकर यांनी झेपमध्ये वर्षभरात झालेल्या activities, मुलांच्या यशस्वी कृती यांचा आढावा घेणारे presentation च्या माध्यमातून सर्वांना माहिती दिली.

तसेच, या निमित्ताने वर्षभरात केलेल्या काही विशेष प्रगतीबद्दल 11 मुलांचे व क्रीडास्पर्धेतील 12 विजेत्यांचे पाहुण्यांच्या हस्ते विशेष पारितोषिक देऊन कौतुकही करण्यात आले.

प्रमुख अतिथी, पालक, मुले, शिक्षक, तसेच संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष वर्षा तावडे, सचिव, सीमा कांबळे, समीर गाजरे, भूषण जोशी तसेच सर्व हितचिंतकांनी कार्यक्रमाला प्रचंड संख्येत उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संपूर्ण कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी क्रांती ठाकूर यांनी पार पाडली. तर, संस्थेच्या समन्वयक आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली.