मुंबई, दि. 5 (पीसीबी) – पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं रविवारी रात्री (दि. 4 जून 2023) निधन झालं. त्यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या काही महिन्यांपासून श्वसनाशी संबंधित संसर्गानं आजारी होत्या. त्यांच्यावर दादर येथील खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर आज उपचारादरम्यान त्यानी अखेरचा श्वास घेतला.
सुलोचना लाटकर यांचा 30 जुलै 1928 रोजी जन्म झाला होता. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक भुमिका गाजवल्या. त्यांनी सुमारे 250 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये भुमिका केल्या.
हिंदी सिनेमामध्ये त्यांनी 1950 आणि 1960 च्या दशकामध्ये आईच्या अनेक भूमिका केल्या आहेत. सुलोचना दीदींच्या जाण्याने मराठी चित्रपट जगताला मोठा धक्काच बसला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
दरम्यान, सुलोचना दीदी हॉस्पीटलमध्ये दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या.










































