ज्येष्ठांच्या घरावर दरोडा घालणारी टोळी पुणे पोलिसांच्या जाळ्यात; केअर टेकर म्हणून करत होते काम

0
237

पिंपरी, दि.13 (पीसीबी) : कामगार पुरविण्याच्या एजन्सीद्वारे पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या घरी काम करतात. काही दिवस काम करून घराची, माणसांची रेकी करतात आणि नंतर आपल्या साथीदारांसोबत मिळून घरातील ज्येष्ठांना शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकतात. असा सपाटा लावलेल्या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये कामगार पुरवणा-या एजन्सीच्या मालकाचा देखील समावेश आहे. हे सर्व आरोपी पिंपरी-चिंचवड शहरातील आहेत.

आकाश कांबळे (वय 22, रा. निगडी), दीपक सुगावे (वय 21, रा. चिंचवड), संदीप हांडे (वय 25, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), छगन जाधव (वय 48, रा. चिंचवगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी 10 डिसेंबर रोजी मध्यरात्री एक ते अडीच वाजताच्या सुमारास एरंडवणा परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकांच्या घरावर दरोडा टाकला होता. दरम्यान आरोपींनी घरातील ज्येष्ठ नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

आरोपींनी या गुन्ह्यात 38 तोळे सोन्याचे दागिने, तीन हजार अमेरिकन डॉलर, 80 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 11 लाख 52 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी छगन हा या गुन्ह्यातील मास्टरमाईंड आहे. त्याची अजिंक्य नर्सिंग नावाची कामगार पुरवण्याची चिंचवड भागात एजन्सी आहे. या एजन्सीमार्फत आरोपी संदीप हा एरंडवणा येथील एका बंगल्यात मागील वर्षभरापूर्वी केअर टेकर म्हणून कमला लागला होता. दरम्यान त्याने बंगल्याची आणि माणसांची रेकी केली. त्यानंतर 10 डिसेंबर रोजी मध्यरात्री बंगल्याच्या गच्चीवरील खिडकीचे गज कापून सर्व आरोपींनी बंगल्यात प्रवेश केला आणि दरोडा टाकून 11 लाख 52 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. कोथरूड पोलिसांनी दोन दिवसात गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक केली आहे