जेलवारी केलेले गुजरातचे एक गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत – शरद पवार

0
486

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – कलम ३७०वरून राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “निवडणुकांच्या प्रचाराचा पारा चढू लागला आहे. गुजरातचे एक भले मोठे गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी अनेकदा जेलवारीही केली आहे. मी निवडणूक लढवत नसतानाही त्यांच्या तोंडात सतत माझेच नाव आहे,” अशी टीका पवार यांनी शाह यांच्यावर केली.

विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून कलम ३७०चा वारंवार पुर्नउल्लेख केला जात आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शरद पवार हे कलम ३७०च्या विरोधात असल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे त्यांच्या सभेत यावरून शरद पवारांवर टीका करत असून, त्याला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. शिरूर येथे झालेल्या प्रचार सभेत शरद पवार म्हणाले,”हे गृहस्थ मला विचारतात ३७० वर उत्तर द्या. ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. सभागृहात माझ्याबद्दल काही नोंद आहे का? मी काही गोंधळ केला का? मग जाब कसला विचारता? यांच्याकडे सांगण्यासाठी काहीच नाही म्हणून कलम ३७०चा मुद्दा पुढे केला जात आहे,” असे पवार यांनी सांगितले.

शाह यांना उत्तर देताना पवार म्हणाले,”निवडणुकांच्या प्रचाराचा पारा चढू लागला आहे. गुजरातचे एक भले ‘मोठे’ गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी अनेकदा जेलवारीही केली आहे. मी निवडणूक लढवत नसतानाही त्यांच्या तोंडात सतत माझेच नाव… निवडणूक शरद पवार या एका नावावरच ते लढवत आहेत,”असा टोला पवार यांनी लगावला.

“गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात सांगतात की, आता काश्मीरमध्ये शेती करणे शक्य आहे. मला सांगा इथले घरदार सोडून काश्मीरात कोण जाणार आहे का शेती करायला? हे मुद्द्याचे बोलतच नाहीत.. महागाईवर बोला, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला, आत्महत्यांवर बोला, ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोला की..,” असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.