जुनी सांगवी परिसरात डिझेलटँकरने 6 जणांना उडवले; भीषण अपघातानंतर टँकर चालकाने ठोकली धूम

0
356

जुनी सांगवी, दि.३१(पीसीबी) : जुनी सांगवी परिसरात एका भरधाव टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सहा जणांना गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामधील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सांगवी पोलिसांनीकडून मिळाली आहे. या अपघातानंतर टँकर चालक फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा तपास सुरु आहे.

रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जुनी सांगवी परिसरात हा अपघात घडला. चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी राधेश्याम बब्रुवान मुळे (वय 26, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात टँकर चालकाविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर टँकर चालक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सांगवी फाटा येथून डिझेलटँकर (एमएच 14 एचयू 6872) हा माकन चौक जुनी सांगवीच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. त्याचवेळी टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकरने रस्त्यावरुन चालत जात असलेल्या लोकांना धडक दिली. त्यानंतर टँकर एका इलेक्ट्रिक खांबाला जावून जोरात धडकला. या अपघातामध्ये सहा जण जखमी झाले असून यांच्यापैकी चार जणांची ओळख पटली असून ते किरकोळ जखमी आहेत तर दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी सांगवी पोलिसांनी माहिती दिली आहे.