जयंतराव, आघाडी सरकार कुठे आहे? भाजपचे हजारो कार्यकर्ते कोरोना लढ्यात सहभागी आहेत – चंद्रकांत पाटील

0
362

मुंबई,दि.१२(पीसीबी) – जयंतराव, आघाडी सरकार कुठे आहे? भाजपचे हजारो कार्यकर्ते कोरोना लढ्यात सहभागी आहेत, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विधानपरिषदेवर नियुक्ती सदस्य करण्यावरुन आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर जयंत पाटील यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. आता चंद्रकांत पाटलांनी पाटलांवर पलटवार करत प्रश्न उपस्थित केला आहे.

जयंतराव, कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा तुमच्या स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा. त्यांना त्याची गरज सगळ्यात जास्त असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपचे हजारो कार्यकर्ते आज राज्यभर जीव तोडून मदत कार्य करत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ५६० कम्युनिटी किचन्स चालवली जात आहेत. ४३ लाख कुटुंबांना जेवण किंवा शिधा पुरवला जात आहे. ६.५० लाखांपेक्षा जास्त मास्क आणि ४.७५ लाख सॅनिटायझरचे वाटप केलं असल्याचं पाटलांनी सांगितलं.