जमिनीच्या न्यायालयीन दाव्यांची माहिती आता ऑनलाइन

0
402

पुणे, दि. ३० (पीसीबी): जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात होणारी नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी जमिनीच्या न्यायालयीन दाव्यांची माहिती आता ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहे.

जमीन खरेदी व्यवहारांमध्ये भरपूर नागरिकांची फसवणूक होत आहे. ती रोखण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने महाभूमी संकेतस्थळावर राज्यात मालमत्ता आणि जमिनींबाबत न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यांची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारातील नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी मदत होणार आहे.

जमिनीचे भावकीत किंवा शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर वाद सुरू असतात. अशा जमिनीची विक्री करताना नागरिकांना पूर्ण माहिती दिली जात नाही. व नागरिकांची फसवणूक केली जाते. ती खरेदी करताना या जमिनींचे दावे न्यायालयात सुरू आहेत किंवा कसे, याची माहिती मिळत नाही. दस्त नोंदणी झाल्यानंतर वाद असल्याचे लक्षात येते. तोपर्यंत सर्व व्यवहार पूर्ण झालेला असतो. अशा प्रकरणांमध्ये मालमत्ता खरेदी करणाऱ्या नागरिकांची फसवणूक होते.

दरम्यान, नागरिकांनी फसवणूक टाळण्यासाठी महसूल विभागात एखाद्या अधिकाऱ्याकडे दावा दाखल करावा. दावा दाखल केल्यानंतर संबंधित लिपिक या दाव्याची माहिती गाव, तालुका, जमिनीचा सर्वेक्षण क्रमांक किंवा गट क्रमांकासह दाव्याची माहिती भरणार आहे. ही माहिती भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळाला जोडली जाणार आहे. एखाद्या नागरिकाने महाभूमी या संकेतस्थळवर जाऊन ‘न्यायालयीन खटले’ या पर्यायावर गेल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव निवडून त्यानंतर नगर भूमापन क्रमांक (सिटी सर्वेक्षण क्रमांक) टाकल्यास संबंधित दाव्याची माहिती मिळणार आहे.