‘जनसंपर्क आणि प्रसारमाध्यमे’ या पुस्तकाचे प्रकाशन

0
334

मुंबई, दि.११ (पीसीबी) : महावितरणच्या लातूर परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन दिवटे लिखीत ‘जनसंपर्क आणि प्रसार माध्यमे’ या पुस्तकाचे प्रकाशन महावितरणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड मुंबई येथे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी श्री. विजय सिंघल यांच्यासह संचालक (संचालन), श्री. संजय ताकसांडे, संचालक (वित्त) श्री. रविंद्र सावंत, संचालक (प्रकल्प / मानव संसाधन) श्री. भालचंद्र खंडाईत, कार्यकारी संचालक (वाणिज्य) सतिश चव्हाण, मुख्य महाव्यवस्थापक (तां.आ.) श्री. भरत जाडकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. अनिल कांबळे हे उपस्थित होते.

डॉ. मोहन दिवटे यांनी लिहिलेले ‘जनसंपर्क आणि प्रसार माध्यमे’ हे पुस्तक मुक्तरंग प्रकाशन लातूरतर्फे प्रकाशित करण्यात आले असून सदर पुस्तकास महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगत सिंह कोश्यारी आणि भारताचे माजी गृहमंत्री व पंजाब राज्याचे माजी राज्यपाल श्री. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या प्रस्तावना आहे.

या पुस्तकातून प्रारंभिक काळातील माध्यम सृष्टी, भारतीय माध्यम व्यवस्था, मराठी वृत्तपत्र सृष्टी, जनसंपर्क, महावितरणमधील जनसंपर्क विषयक चांगले उपक्रम आणि माध्यमांची भूमिका इत्यादी घटकांवर लेखकाने प्रकाश टाकला आहे.

चांगली साहित्यकृती हे जनसंपर्काचे उत्तम साधन आहे, असे सांगतानाच डॉ. दिवटे यांनी लिहिलेले हे पुस्तक जनसंपर्काचा आदर्श नमूना आहे. त्यातून महावितरणच्या चांगल्या कार्यक्रमाची समाजाला ओळख होईल. महावितरणची प्रतिमा जनमाणसात उजाळली जाईल. भविष्यात अशीच चांगली साहित्यकृती डॉ. दिवटे यांच्याकडून निर्माण व्हावी, अशी अपेक्षा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क विभागाचे राहुल नाईक व इतरांनी परिश्रम घेतले.