चौकीदार चोर है ; राहुल गांधींचा माफीनामा

0
537

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – ‘चौकीदार चोर है’ या शब्द प्रयोगावर दिलगिरी व्यक्त करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी २२ पानी प्रतिज्ञापत्र सादर केले. यावर सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) ताशेरे ओढले.  त्यानंतर राहुल यांच्यावतीने वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी माफीनामा व्यक्त केला.

सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता आणि न्या. संजीव खन्ना यांच्या पीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली. यावेळी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी राहुल गांधी यांनी २२ पानांचे प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात दिलगिरी हा शब्द अवतरणात लिहिला आहे. त्यावरूनही न्यायालयाने राहुल यांना खडेबोल सुनावले. अवतरणात दिलगिरी शब्द लिहिण्याचा अर्थ काय काढायचा, असा सवाल न्यायालयाने केला.

राहुल गांधी यांनी न्यायालयाचा  दाखला  देत ‘चौकीदार चोर है’ हा शब्दाचा वापर केला होता.  यावर  तुम्ही जे बोललात, ते आम्ही सांगितले होते का?, असा सवाल न्यायालयाने केला. त्यावर  राहुल गांधी आपली चूक मान्य करत आहेत. त्यासाठी ते माफी मागत आहेत.  त्यांनी न्यायालयाचा  दाखला देऊन असे विधान करणे चुकीचे आहे, असे संघवी म्हणाले.