चित्रा वाघ यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी; भाजपमध्ये प्रवेश करणार ?

0
771

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – सचिन अहिर यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ  भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. शुक्रवारी रात्री त्यांनी आपल्या पदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवला आहे.

शुक्रवारी कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या बैठकीचा एक फोटोही व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या भाजपात प्रवेश करतील अशा चर्चांना उधाण आले होते.  दरम्यान, आपण आपल्या पदाचा राजीनामा सोपवत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच महिलांचा आवाज बनण्याची संधी आपल्याला दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचेदेखील आभार मानले आहेत.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या  पुढाकारातून त्या भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान,  गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षांतर आणि स्थित्यंतरामुळे पक्ष संपत नाही, अशी  प्रतिक्रिया दिली होती.