चिखलीत १२ वर्षीय मुलीला लाकडाने अमानुष मारहाण करणाऱ्या बापावर गुन्हा दाखल

0
493

चिखली, दि. २८ (पीसीबी) – आई-वडलांची भांडणे सुरु असताना १२ वर्षीय मुलगी घाबरुन ओरडली यामुळे चिडलेल्या बापाने चुलीजवळील लाकडाने मुलीला अमानुष मारहाण करुन जखमी केले. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.२६) सायंकाळी साडेचारच्या सुमारास चिखली म्हत्रे वस्तीतील भिमशक्तीनगर झोपडपट्टीमध्ये घडली.

याप्रकरणी १२ वर्षीय मुलीने बापाविरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बाळु आबाराव जावळे (वय ३४, रा. भिमशक्तीनगर झोपडपट्टी, म्हत्रेवस्ती, चिखली) यांच्यावर बाल न्याय अधि नियम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पीडित १२ वर्षीय मुलगी घरात होती. यावेळी तीचे वडिल बाळु आणि आईमध्ये कडाक्याचे भांडण सुरु झाले. हे पाहून मुलगी घाबरली आणि जोरात ओरडली. याचा बाळु याला राग आला आणि त्याने चुलीजवळील लाकडाने मुलीच्या डोक्यात आणि उजव्या हाताच्या कोपऱ्यावर मारले यामुळे मुलगी गंभीर जखमी झाली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात वडिल बाळु विरोधात बाल न्याय अधि नियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळुला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चिखली पोलीस तपास करत आहेत.