चिखलीतील संतपीठाच्या वाढीव खर्चाच्या निषेधार्थ शेकापचे पिंपरीत भजन आंदोलन

0
567

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या संतीपीठासाठी पाच कोटी रुपयांची वाढीव निविदा मंजूर केल्याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्ष आणि इतर सामाजिक संघटनांच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी (दि. ५) भजन आंदोलन करण्यात आले.

महापालिका चिखली येथे संतपीठ उभारणार आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. ४० कोटींची निविदा असताना स्थायी समितीने वाढीव ५ कोटी रुपयांसह एकूण ४५ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली. त्यावरून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. संतांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी या विचारांचा प्रसार करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या संतपीठाच्या कामातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

संतपीठाच्या कामासाठी मंजूर केलेल्या वाढीव खर्चाच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्ष व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने शनिवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. संतपीठाच्या वाढीव खर्चाची मंजूर निविदा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात मानव कांबळे, हरीश मोरे, नितीन बनसोडे, भालचंद्र फुगे, राहुल पडवळ, छाया देसले आदी सहभागी झाले होते.