कर्जबाजारीपणाला कंटाळून चिंचवड, मोहननगरमधील एक कुटुंब १५ दिवसांपासून बेपत्ता

0
1393

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यावसायिकाचे कुटुंब सुसाइड नोट लिहून बेपत्ता झाले आहे. ही घटना चिंचवड स्टेशन येथील मोहननगर परिसरात घडली. हे कुटुंब बुधवार (दि.५) डिसेंबर पासून बेपत्ता झाले आहे. पंधरा दिवस उळटून देखील या कुटुंबातील कुणाचाच शोध लागलेला नाही.

संतोष एकनाथ शिंदे (वय ४७), पत्नी सविता शिंदे (वय ४१), मुलगा मुकुंद शिंदे (वय २२), मैथिली शिंदे (वय १८, सर्व रा. शिंदे निवास, मोहननगर, चिंचवड) अशी एकाच कुटुंबातील चौघांची नावे आहेत. याप्रकरणी संतोष यांचे बंधू नितीन एकनाथ शिंदे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शिंदे यांचा ओम ट्रान्स्पोर्ट नावाने व्यवसाय असून त्यांच्या विविध दहा गाड्या आहेत. संतोष आणि त्यांचे बंधू नितीन हे एकाच इमारतीत राहतात. संतोष यांनी व्यवसाय आणि इतर कामांसाठी विविध ठिकाणांहून तब्बल दोन कोटींचे कर्ज काढले होते. या कर्जाचे हप्ते भरू न शकल्याने त्यांना पतसंस्था तसेच कर्जदारांचे वारंवार फोन येत होते. यामुळे शिंदे कुटुंब मानसिक दबावाखाली होते. याशिवाय राहत्या घरावरही कर्ज काढण्याचा त्यांचा विचार होता.

बुधवारी (दि.५) डिसेंबरला फिरायला जाऊन येतो, असे भावाला हे संपूर्ण कुटुंब घरातून निघुन गेले. त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ सोडले. त्यानंतर ते बेपत्ता झाले. रात्री उशीर झाला तरी भाऊ आणि त्याचे कुटुंबीय घरी न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यांच्या कुटुंबातील एकही जण फोन उचलत नव्हते. त्यांच्या भावाने त्यांच्या घराची तपासणी केली असता त्या चौघांचेही फोन घरातच होते. या वेळी घरच्यांना तेथे एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये संतोष यांनी लिहिले होते की, ‘माझ्या साऱ्या व्यवहाराचा तपशील डायरीत लिहून ठेवला आहे. मी आणि माझा परिवार आत्महत्या करत आहोत.’ चिठ्ठीशेजारीच घरातील कपाटाच्या चाव्याही ठेवल्या होत्या. मुकुंद शिंदे हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत आहेत. तर मुलगी मैथिली ही १२ वी मध्ये आहे. या कुटुंबाबात कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी त्वरीत पिंपरी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.