चंदा कोचर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

0
698

दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

सुधांशू धर मिश्रा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सुधांशू यांची सीबीआयच्या रांची येथील आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉनला ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. मात्र, यातील २ हजार ८१० कोटी रुपयांची परतफेड झाली नाही आणि ते एनपीए (नॉन परफॉर्मिंग अॅसेट) म्हणून घोषित करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन समुहाचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत अडचणीत सापडलेले आहेत. याप्रकरणी नुकतीच केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईतील व्हिडिओकॉन मुख्यालय आणि इतर ३ ठिकाणांवर छापेमारी केली होती. सीबीआयने या कारवाईनंतर चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. एन. धूत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने व्हिडिओकॉन ग्रुप व चंदा कोचर कर्ज अनियमितताप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.