ग.दि.मा. नाट्यगृह, तारांगन ताबडतोब सुरू करण्याची सिटीझन फॉर पिंपरी चिंचवड संघटनेची आयुक्तांकडे मागणी

0
224

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – उद्घटानाअभावी गेली अनेक महिने बंद असलेले महत्वाचे प्रकल्प तातडिने सुरू करण्याची मागणी सिटीझन फॉर पिंपरी चिंचवड या संघटनेने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे आज केली.

चिखली जलशुध्दीकरण प्रकल्प १०० टक्के कार्यान्वित करावा, प्राधिकणातील ग. दी. माडगुळकर नाट्यगृह तसेच सायन्सपार्क मधील तारांगन ताबडतोब खुले करावे, अशी आग्रही मागणी संघटनेने केली आहे.
संघटनेचे सुर्यकांत मुथियान, राजीव भावसार, ऋषिकेश तपशालकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे त्याबाबतचे निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या वतीने लोकांच्या हितासाठी कोट्यवधी रुपये खर्चाची अनेक महत्वाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. किमान जे प्रकल्प वेळेत पूर्ण झालेले आहेत ते तत्काळ नागरिकांसाठी खुले केले पाहिजेत. प्रत्यक्षात आजही तसे कुठेही होताना दिसत नाही. केवळ राजकीय पक्ष आणि नेते यांच्या श्रेयवादाच्या लढाईत शेकडो कोटींचे प्रकल्प आजही धूळ खात पडून आहेत. दीड वर्षांपूर्वी लोकनियुक्त नगरसदस्य असताना शक्यतोवर असे होत नसे. याचा खूप वाईट परिणाम होतो आणि प्रकल्पांची नासधूस होते, ते गंजतात, सडतात आणि करदात्या जनतेचे लाखो-करोडो रुपयांची अक्षरशः माती होते. पिंपरी चिंचवड महापालिकेत मार्च २०२२ पासून प्रशासकिय राजवट सुरू झाल्यापासून याचे प्रमाण खूप वाढले आहेत. हे तत्काळ थांबले पाहिजे. काम पूर्ण होताच ते ज्यासाठी केले त्यासाठी ते तत्काळ खुले केले पाहिजे, असे आमचे स्पष्ट मत आहे.

चिखली १०० एमएलडी जलशुध्दीकरण प्रकल्प – उन्हाळ्यामुळे शहरातील पाण्याची गरज वाढली आहे. चिखली येथील १०० एमएलडी चा प्रकल्प १०० टक्के सुरू केला तर या समस्ये निराकरण होणार आहे. गेले सहा महिने प्रशासन फक्त आश्वासन देते, पण राजकीय दबावामुळे श्रेयवादाच्या लढाईत त्यावर ठोस निर्णय घेत नाही. सर्वसामान्य नागरिकांचे त्यात प्रचंड हाल होत आहेत. पाणी उपलब्ध असूनही केवेळ राजकारणामुळे ते मिळणार नसेल तर ते प्रशासनाचे अपयश आहे. आता त्याबाबत ताबडतोब निर्णय घ्यावा, अन्यथा सिटीझन फोरम ऑफ पिंपरी चिंचवड त्यासाठी प्रसंगी आक्रमक पवित्रा घेईल, असा इशारा संघटना सदस्यांनी दिला आहे.

ग.दि. माडगुळकर नाट्यगृह – शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा हा प्रकल्प आहे. गेली सात-आठ वर्षे बांधकाम सुरू होते. त्यासाठी सुमारे ७० कोटी खर्च झाला. काम पूर्ण होऊन हे नाट्यगृह धूळ खात पडून आहे. आज-उद्या सुरू होणार अशी आश्वासने खूप झाली. रसिक प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत आहेत. सहनशिलतेचा अंत पाहू नका इतकेच. ताबडतोब हे नाट्यगृह खुले करा, अशी विनंतीही केली आहे.

सायन्स पार्क मधील तारांगन प्रकल्प – सायन्स पार्क येथे गेली पाच वर्षापासून बांधकाम सुरू असलेला तारांगन पूर्ण झाल्याच्या बातम्या वारंवार वाचनात आल्या. पिंपरी चिंचवड शहराच्या वैभवात हा मानाचा तुरा आहे. आता प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी केवळ मंत्रीमहदयांची वेळ मिळत नसल्याने तो जनतेसाठी खुला केलेला नाही, असे समजले. पंधरा दिवसांपूर्वीच शालेय विद्यार्थ्याना सुट्टी सुरू झाली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरच नव्हे तर राज्यातून शालेय विद्यार्थी सायन्सपार्क तसेच तारांगन पाहण्यासाठी येतात. तारांगन सुरू नसल्याने ते निराश होऊन जातात. प्रशासनाने तारांगन त्वरीत खुले करावे, अन्यथा शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.