गुरुवारी मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर, कोरोनाचा आढावा घेणार

0
298

पुणे, दि. २९ (पीसीबी) : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुणे दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे दौऱ्याला निघण्याची चिन्हं आहेत. पुण्यात ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री आढावा बैठक घेण्याचेही संकेत मिळत आहेत.

पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला पुण्यात आढावा बैठक घेताना दिसतात. परंतु “मुख्यमंत्री ‘मातोश्री’बाहेर पडत नाहीत, राज्याच्या दौऱ्यावर जात नाहीत” अशी तक्रार भाजपकडून सातत्याने होत आहे. मुंबईत असूनही शेजारी जिल्हा पुण्यात न आल्याने उद्धव ठाकरेंविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचे नियोजन होताना दिसत आहे.

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यात विभागीय आयुक्त कार्यालयात चर्चा करण्याची चिन्हं आहे. ससून किंवा नायडू यासारख्या एखाद्या रुग्णालयाला मुख्यमंत्री भेट देण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटी वॉररुममध्येही ते पाहणी करु शकतात. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना परिस्थितीबद्दल सर्व माहिती संकलनाचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे.
पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियोजन नीट होत आहे, मग अंमलबजावणी होताना काही अडचणी आहेत का? कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखणे आणि मृत्यूदर कमी करणे यावर उद्धव ठाकरे लक्ष केंद्रित करु शकतात. पुण्याला निधी अपुरा पडत आहे का, याविषयीही ते विचारणा करण्याची शक्यता आहे.