”गावच्या गावं उद्धवस्त असताना पंचनाम्याची गरज काय?”- राजू शेट्टी

0
397

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. गावच्या गावं उद्धवस्त झालेली असताना, सरकारला पंचनामे करायची गरज काय? असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत करा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी, शेतकऱ्यांना आधाराची गरज असताना सत्ता कशी मिळवता येईल, याकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचा आरोप केला आहे. जालन्यात नुकसानीची पाहणी करताना ते बोलत होते.

राजू शेट्टी हे सध्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी करत आहेत. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे. परतीच्या पावसामुळे शेतातील पीकं वाहून गेली आहेत. नदीकाठच्या जमिनीही देखील वाहून गेल्या आहेत. त्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत करण्यात यावी. नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.