गांधींजींच्या हत्येचे कधीच समर्थन करनार नाही, अनंतकुमार हेगडेंचे घुमजाव; म्हणे ट्विटर अकाऊंट हॅक

0
331

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – नथुराम गोडसे वादात प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विधानाचे समर्थन करणाऱ्या ट्विटवरुन केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी घुमजाव केले आहे. माझे ट्विटर अकाऊंट गुरुवारपासून हॅक झाले होते. महात्मा गांधींजींच्या हत्येचे कधीच समर्थन करता येणार नाही आणि त्यांच्या मारेकऱ्यांविषयी सहानूभूती दाखवणे चुकीचे आहे, असे हेगडे यांनी म्हटले आहे.

महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, तो देशभक्त आहे आणि तो देशभक्तच राहील, असे वादग्रस्त विधान प्रज्ञासिंह यांनी केले होते. यामुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या होत्या. प्रज्ञासिंह यांच्या विधानाशी भाजप सहमत नाही, असे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी सकाळी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते अनंतकुमार हेगडे यांनी पक्षाविरोधात भूमिका घेत साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विधानाचे समर्थन केले होते. सात दशकानंतर सध्याची पिढी एका बदललेल्या वैचारिक वातावरणात गोडसेबाबत चर्चा करत आहे. ही चर्चा पाहून गोडसेलाही आनंद झाला असेल, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते.

हेगडेंच्या या ट्विटमुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या होत्या. अखेर हेगडे यांनी ट्विट डिलीट केले असून माझे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते, अशी सारवासारव हेगडे यांनी केली आहे.