गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार : मधुकर बाबर

0
566

पिंपरी चिंचवड शहर सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा निर्णय

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) -: कोरोना कोविड-19 मुळे देशभर लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. या जागतिक महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सार्वजनिक उत्सव साधेपणाने सोशल डिस्टन्स पाळत साजरे करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. 18 जून 2020 रोजी याबाबत मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख गणपती मंडळांच्या अध्यक्षांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्दारे संवाद साधला होता. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पिंपरी चिंचवड शहर सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने यावर्षीचा गणेशात्सव साधेपणाने साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक मधुकर बाबर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये साडे आठशेहून जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. भक्त, भाविकांच्या देणगीतून व वर्गणीतून वर्षभर विविध सामाजिक, धार्मिक, समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. परंतू, यावर्षी लॉकडाऊनमुळे सर्व मंडळांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. भक्त, भाविकांना व वर्गणीदारांनादेखील अशा उत्सवास देणगी देणे अशक्य आहे. गणपती उत्सवात सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे. यामुळे या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून या काळात भक्त भाविकांकडून तसेच वर्गणीदार, हितचिंतक यांच्याकडून मिळालेला निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार आहे, अशीही माहिती बाबर यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीस समन्वयक मधुकर बाबर, बजरंग मित्र मंडळाचे दत्ता पवळे, संतोष कवडे, गांधी पेठ तालीम मित्र मंडळाचे राजाभाऊ गोलांडे, श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळाचे संभाजी सुर्यवंशी, राष्ट्रतेज तरुण मंडळाचे नाना काळभोर, तरुण मित्र मंडळाचे उल्हास शेट्टी, जयहिंद मित्र मंडळाचे राजेश फलके, शिवराजे प्रतिष्ठानचे रोमी संधू, उत्कर्ष मित्र मंडळाचे नकूल भोईर, नव तरूण मित्र मंडळाचे दत्तात्रय चिंचवडे, लांडगे लिंबाची तालीम मित्र मंडळाचे ॲड. नितीन लांडगे, एकता मित्र मंडळाचे प्रमोद कुटे, सिझन ग्रुपचे प्रशांत शितोळे आदींसह शहरातील प्रमुख मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.