खासदार संजय राऊत यांची सुटका होण्याची दाट शक्यता

0
332

मुंबई, दि. १० (पीसीबी) – ईडीच्या ताब्यात असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची सुटका होणयाची शक्यता आहे. राऊत यांना बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राऊत कुटुंबीयांकडून भाजपसोबत समेट झाला असल्याची चर्चा आहे.

राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी मातोश्रीवरून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि ते दिल्लीला दाखल झाले आहेत. सुनील हे दिल्लीत भाजपच्या मोठ्या नेत्यांची भेट घेऊन संजय राऊत यांच्या सुटकेसाठी धडपड करीत असल्याची माहीती पुढे आली आहे. त्यामुळे १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत असलेले संजय राऊत बाहेर येण्याची शक्यता आहे. राऊत यांच्या सुटकेसाठी मातोश्रीनेच दिल्लीतील भाजप नेत्यांपर्यंत ‘फिल्डिंग’ लावल्याचे समजते. म्हणूनच राऊत यांना वाचविण्यासाठी भाजपचा कोण नेता आपले ‘वजन’ वापरत आहे आणि त्यासाठी शिवसेना म्हणजेच ठाकरे हे भाजपसोबत काय समझोता करणार ? हे पुढच्या काही तासांत उघड होण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे कंबरडे मोडण्यासाठी शिवसेनेचा खासदार संजय राऊत यांना अटक केली आहे. त्यानंतरही राऊत हे आक्रमकच राहिले. ईडीच्या ताब्यानंतर त्यांचा मुक्काम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडीत असल्याने राऊत हे जामिनावर बाहेर येऊ शकतात,अशी अटकळ बांधली जात आहे. अशातच ठाकरे हे राउतांना भेटण्यासाठी ऑर्थर रोड तुरुंगात जाणार असल्याची चर्चाही पसरली होती. ऐन गणेशोत्सव धमधुमीतच ठाकरे आणि राऊत यांच्या संभाव्य भेटीचा वेगवेगळ्या बाजुन् अर्थ काढला जात होता. त्यानंतर राऊत यांचे भाऊ सुनील हे अचानक शुक्रवारी मातोश्रीवर आले आणि ठाकरे यांची भेट घेतली.

मतोश्रीवरून निघालेल्या सुनील राऊत यांनी थेट विमानतळाकडे धाव घेऊन सांयकाळी दिल्ली गाठली. आपल्या भावाच्या सुटकेसाठी राऊत आणि ठाकरे यांच्यात खलबते झाल्याचे समजते ; तेव्हाच महाराष्ट्र आणि दिल्लीतील काही भाजप नेत्यांशीही बोलणे झाल्याची शक्यता आहे. त्यामुळेच सुनील राऊत हे दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर संजय राऊत हे भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर रोजच तुटून पडत होते. राऊत यांच्या भूमिकांमुळे भाजप आणि शिवसेनेत वितुष्ट टोकाला गेले होते. त्यातूनच ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून बाहेर काढून बंडखोरांसोबत सरकार आल्यानंतर भाजपने राऊत यांना हिसका दाखवला आणि ठाकरेंना इशारा दिला. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणातील गैरव्यवहार असल्याचे पुरावे दाखवून ईडीने राऊत याना अटक केली. त्यानंतर ही शिवसेना आणि राऊत हे भाजपसोबत दोन हात करण्याची भाषा करीत होते. भाजप विरोधातील तलवारी म्यान करून राऊत यांच्या सुटकेसाठी ‘मातोश्री’ म्हणजेच दस्तुरखुद्द ठाकरे हालचाली करत आहेत, असे समजते.

याचदरम्यान महाराष्ट्रातील एक ‘ताकदवान’ नेताही ठाकरेंच्या मदतीला धावून आल्याच्या चर्चा आहेत. भाजपचा हा नेता आणि उद्धव ठाकरे यांच्या ‘युती’तून संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम संपण्याचा परिणाम दिसू शकतो. त्यामुळे शिवसेना आता भाजप नेतयांपुढे हात टेकून आपल्या नेत्याला सहीसलामत बाहेर आणणार का? याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला आहे.