खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले बेमूदत उपोषणाला

0
316

भाजपचे अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे

पिंपरी, दि. २८ (पीसीबी): मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मुंबईत आझाद मैदानावर शनिवारपासून (ता.२६) बेमूदत उपोषणाला सुरवात केली आहे. त्यांच्या या आंदोलनाला पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आज लगेचच पाठिंबा जाहीर केला.
ज्यांना आझाद मैदानावर जाणे शक्य होणार नाही, अशा मराठा बांधवांनी आपापल्या परीने उपोषणाला समर्थन द्यावे, असे आवाहनही लांडगे यांनी केले. मराठा आरक्षण मिळवणे ही आपली प्रमुख मागणी आहे. मात्र, त्यासाठी दीर्घकालीन न्याय प्रक्रिया आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाची आरक्षणापासून होरपळ कमी करावी आणि मान्य केलेल्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी समाजाची मागणी आहे. छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाजाच्या हक्कांसाठी सदनशीर मार्गाने लढा करेल, यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या?

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आंदोलकांच्या वारसांना नोकरी देण्याची घोषणा सरकारनेच केली होती. मात्र, कुणालाही नोकरी दिलेली नाही. याउलट काही वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्याचे प्रस्तावित केले जात आहे, हे समाजाला मान्य नाही. विशेष बाब म्हणून सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा. मराठा आरक्षण मिळण्यासाठी न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींचीअंमलबजाणी करण्यास तात्काळ सुरूवात करून लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लागणारी प्रक्रिया सुरू करावी. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे दिला जाणारा दहा लाख रूपये कर्ज व्याज परतावा हा २५ लाख रुपये करण्यात यावा, या मागणीवर सरकारने सकारात्मकता दाखवली होती. मात्र, अद्यापही याची अंमलबजावणी केलेली नाही.