खाकीतल्या देवदूताने रक्तदान करुन वाचवले लहान मुलीचे प्राण

0
332

>> “पोलीस हवालदार आकाश तुमचा आम्हाला अभिमान वाटतो” – अनिल देशमुख

मुंबई, दि. ०४ (पीसीबी) – मुंबई पोलीस दलातील हवालदार पदावर कार्यरत असणाऱ्या आकाश गायकवाड यांनी ओपन हार्ट सर्जरी होणाऱ्या एका लहान मुलीला रक्तदान करत माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आकाश गायकवाड यांचं कौतुक केलं असून “आकाश तुझा आम्हाला अभिमान आहे” अशा शब्दांत फोन करून विशेष अभिनंदन केलं.

३ मे रोजी हिंदुजा रुग्णालात दाखल १४ वर्षीय सनाफातिम खान या मुलीची ओपन हार्ट सर्जरी होणार होती. यासाठी A+ रक्त लागणार होते. मुंबईमध्ये निसर्ग चक्रीवादळ व करोनामुळे रक्त देण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या योग्य असे कोणीही रुग्णालयात येऊ शकले नाहीत. अशा गंभीर परिस्थितीत रुग्णालयात नेमणुकीस असलेले ताडदेव पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार आकाश बाबासाहेब गायकवाड संकटप्रसंगी धावून आले. रक्तदान करून त्यांनी मुलीला जीवनदान दिले.

अनिल देशमुख यांनी कौतुक करताना कोणत्याही संकटसमयी पोलीस हे देवदूत बनून मदतीला येतात. हे यातून पुन्हा सिद्ध झाले असल्याचं म्हटलं आहे. तसंच करोना संसर्ग असो की निसर्ग चक्रीवादळ. सर्वसामान्य नागरिकांसाठी पोलीस दलाचा कायमच भक्कम आधार आहे. आकाश गायकवाड यांच्यासारख्या योद्ध्यांना माझा सलाम! अशा भावना व्यक्त केल्या आहेत. या संपूर्ण पोलीस कुटुंबाचा प्रमुख म्हणून मला आपल्या पोलीस दलाचा अभिमान आहे अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी आकाश गायकवाड यांचा गौरव केला.