खर्गेंना भारताच्या नाही तर इटलीच्या संस्कृतीशी प्रेम – अमित शाह

0
288

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या राफेलच्या पुजनानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी अशा प्रकारच्या तमाशाची गरज नाही. जेव्हा आम्ही बोफोर्स तोफ भारतात आणली होती, तेव्हा अशा प्रकारचा दिखावा केला नव्हता असे म्हटले होते. आता यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खर्गेंवर निशाणा साधला आहे. खर्गेंना भारताच्या नाही तर इटलीच्या संस्कृतीबाबत अधिक माहिती असल्याचे शाह म्हणाले. ते बुधवारी रोहतक येथील सभेदरम्यान बोलत होते.

राफेलच्या शस्त्र पूजेचा तमाशा करण्याची काय गरज होती? असे वक्तव्य खर्गे यांनी केले. परंतु त्यात त्यांचा काही दोष नाही. त्यांना भारताच्या संस्कृतीची नाही तर इटलीच्या संस्कृतीची अधिक माहिती आहे, असे शाह यावेळी म्हणाले. “काँग्रेसला हवाई दलाचे आधुनिकीकरण व भारतीय परंपरांचा त्रास होतो. जो पक्ष क्वात्रोचीची पूजा करतो त्याच्यासाठी स्वाभाविकच शस्त्रपूजा ही अडचण असणार, खर्गेजी आम्हाला बोफर्स घोटाळ्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद” असे भाजपाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली. काँग्रेसबद्दल काय बोलावे. प्रत्येक देशाची आपली एक परंपरा असते आणि ते आपापल्या परीने त्या पार पाडत असतात. भारतात विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजनाची परंपरा आहे, असेही त्यांनी म्हटले. तर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनीदेखील खर्गे यांना घरचा अहेर दिला होता. “शस्त्रपूजा कधी तमाशा होऊ शकत नाही. देशात याची फार जुनी परंपरा आहे. मात्र अडचण अशी आहे की खर्गेजी हे नास्तिक आहेत, पण काँग्रेस पक्षातील सर्वचजण काही नास्तिक नाहीत,” असे ते म्हणाले होते.