क्षितिज उपक्रम उद्योग आणि शिक्षण यातील दुवा ठरेल….. ओमप्रकाश पेठे

0
226

पुणे,दि. ६ (पीसीबी) – उद्योग जगत आणि अभियांत्रिकीची सध्याची शिक्षण पद्धती यामध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी पीसीसीओईने आयोजित केलेली क्षितिज २०२२ ही परिषद उपक्रमशील दुवा म्हणून काम करेल असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश पेठे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (पीसीसीओई) क्षितिज २०२२ ही प्रोजेक्ट शोकेस परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन ओमप्रकाश पेठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीचे अरुण आडिवरेकर, उद्योजक सुधीर मुतालीक, पीसीईटीचे अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी उपसंचालक डॉ. नीळकंठ चोपडे, डॉ. शीतलकुमार रवंदळे डॉ. एन. आर. देवरे, निमंत्रक डॉ. स्वाती शिंदे आदी उपस्थित होते.

क्षितिज २०२२ या प्रोजेक्ट शोकेस परिषदेत नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी, उदयन्मुख उद्योजक, स्टार्ट अपचे प्रतिनिधी तसेच १७० पेक्षा अधिक उद्योजक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी ४८ विविध प्रकल्पाचे सादरीकरण केले. या सर्व ४८ प्रकल्पांना या माध्यमातून उद्योग जगताची जोड़ मिळाली. प्रगत देशांमध्ये महाविद्यालये, उद्योग, सरकार एकत्र येऊन उत्पादन क्षमता वाढवितात. क्षितिज २०२२ मुळे याच धर्तीवर कामाची सुरुवात पीसीसीओईने या निमित्ताने केली आहे. अश्या नविन्यपूर्ण उपक्रमामुळे उद्योग शिक्षण पद्धती यातील दरी भरून निघण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास ओमप्रकाश पेठे यांनी व्यक्त केला.

यावेळी अरुण आडिवरेकर म्हणाले की, पीसीसीओईच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम उद्योजकांसाठी नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योग आणि शिक्षण यामधील सेतू म्हणून काम करीत आहे यातूनच सर्जनशील उद्योजक आणि स्टार्ट-अपची निर्मिती होईल असा विश्वास आहे.
स्वागत डॉ. नीळकंठ चोपडे आणि सहसंयोजक डॉ. पी. के. रजनी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अश्विनी वझे आणि आभार डॉ. पी. ए. देशमुख यांनी मानले.