क्रेजीकोवा, गौफ प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत

0
380

पॅरिस, दि.०७ (पीसीबी) : वेगवान आणि ताकदवान फटके खेळणारी बार्बोरा क्रेजीकोवा आणि अमेरिकेची युवा खेळाडू कोको गौफ यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

चेक्र प्रजासत्ताकच्या क्रेजीकोवा हिने अमेरिकेच्या स्लोआनी स्टिफन्स हिचे आव्हान ६-२, ६-० असे संपुष्टात आणले. चेक प्रजासत्ताकची ३३वी मानांकित क्रेजीकोवा हिने २०१८ मध्ये येथे कॅटरिना सिनिआकोव हिच्या साथीत दुहेरीचे विजेतेपद मिळविले आहे. या स्पर्धेपूर्वी झालेल्या स्ट्रासबोर्ग स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्यापासून ती अपराजित आहे.

तीन वर्षापूर्वी येथे अंतिम फेरी गाठणाऱ्या स्लोआनीकडे तिच्या वेगवान आणि ताकदवान खेळाचे उत्तरच नव्हते. स्लोआनीचे फटक्यांवरही नियंत्रण नव्हते. तब्बल २६ निरर्थक चुका केल्या आणि क्रेजीकोवाला वर्चस्व राखण्याची संधी दिली. क्रेजीकोवाने पहिल्या सेटमध्ये दोनदा सर्व्हिस भेदली आणि तिसऱ्या सेटमध्ये तिने स्लोआनीला कसलीच संधी दिली नाही. तिची गाठ आता कोको गौफशी पडणार आहे.
ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठणारी अमेरिकेची कोको गौफ.

यापूर्वी निकोले वैदीसोवा ही अशी कामगिरी करणारी सर्वात तरुण खेळाडू होती. त्या वेळी ती १७ वर्षे ८६दिवसाची होती. कोको ही जेनिफर कॅप्रिआतीनंतर अशी कामगिरी करणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली.

कारिकर्दीत प्रथमच ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठल्याचा मला कमालीचा आनंद आहे. माझा खेळ खरोखरीच चांगला झाला. हेच सातत्य आता मला टिकवून ठेवायचे आहे, अशी प्रतिक्रिया कोकोने व्यक्त केली. या स्पर्धेत कोको अजून एकही सेट हरलेली नाही.