क्रिकेट सामन्याचे १२०० रुपयांचे तिकीट ब्लॅकने १२ हजाराला

0
141

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पुण्यामध्ये २७ वर्षानंतर विश्वचषकाचे सामने होत आहेत. आज भारत विरुद्ध बांगलादेश असा क्रिकेटचा सामना रंगणार असून याच दरम्यान ब्लॅकने तिकीट विक्री करणाऱ्या दोघांना पिंपरीच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पकडलं आहे. रवी लिंगप्पा देवकर आणि अजित सुरेश कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून सहा हजारांची पाच तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. ती जास्त दराने विकली जात होती. एक तिकीट १२ हजार रुपयांना ब्लॅकने विकलं जात होतं. आरोपींकडून पाच तिकिटे (प्रत्येकी बाराशे रुपये), सात हजार रोख रक्कम असा एकूण ५१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पुण्यात विश्वचषकाचे सामने २७ वर्षानंतर होत आहेत. पुणे यासह महाराष्ट्र आणि देशभरातून क्रिकेट चाहते पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियम बाहेर एकच गर्दी केली आहे. अनेकांनी ऑनलाइन तिकीट मिळवलं आहे. असं असताना आता पिंपरी- चिंचवडच्या अनैतिक मानवी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या टीमने रावेत परिसरात दस का बीस म्हणजे तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याचे तिकिटे जप्त केली आहेत.

अजित आणि रवी हे दोघे जण बाराशे रुपयांच तिकीट जास्त दराने म्हणजे १२ हजार रुपयांना विकत होते. अखेर त्यांना पकडण्यात यश आले असून ब्लॅकने तिकीट विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यांच्या विरोधात भा.द.वी.कलम ४२०,३४ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे, स्वप्न गोरे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे सतीश माने यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलिस अंमलदार सुनील शिरसाठ, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे, यांनी केली आहे.