कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास खेळाडूची हकालपट्टी

0
227

टोकियो, दि.१६ (पीसीबी) – कोविड १९च्या संकटकाळातील विरोध डावलून ऑलिंपिक होणार असले, तरी त्यासाठी खेळाडूला कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे. यातील एक जरी नियम मोडला, तर त्या खेळाडूची ऑलिंपिकमधून हकालपट्टी करण्यात येणार आहे.

ऑलिंपिकला केवळ पाच आठवडे शिल्लक असताना संयोजन समितीने नवी मार्गदर्शक तत्वे जाहिर केली. त्यानुसार रोज चाचणी देणे, मास्कचा वापर अनिवार्य अशा काही नियमांचा समावेश करण्यात आला आहे. संयोजन समितीने ही नवी मार्गदर्शक तत्वे जाहिर केली. एकूण ७० पानाची ही पुस्तिका असून, या नियमांचे काटेकोर पालन झाले की ऑलिंपिक सर्वात सुरक्षित होईल, असे संयोजन समितीने म्हटले आहे.

परिस्थिती गंभीर आहे. स्पर्धा सुरळीत आणि सुरक्षित पार पडावी यासाठी हे नियम करण्यात आले आहे. तुम्ही नियमानुार खेळणार अशी आम्ही अपेक्षा करतो. जर, खेळला नाही, तर तुमच्यावर कारवाई ही केली जाणार.
-पिएरे ड्युकरे, ऑलिंपिक स्पर्धा संचालक

या मार्गदर्शक तत्वांमुळे खेळाडूंवर आणि पदाधिकाऱ्यांवर घालण्यात आलेल्या बंधनांमळे जपानी नागरिकांमध्येही स्पर्धा सुरक्षित याचा विश्वास निर्माण होण्यास मदत होईल, असेही संयोजकांनी म्हटले आहे.

यातील एक जरी नियम खेळाडू किंवा पदाधिकाऱ्याने मोडल्यास संयजोकांनी विविध कारवाईच्या प्रकारांची देखिल माहिती दिली आहे. इशारा, दंड किंवा तात्पुरती किंवा कायमची बंदी, स्पर्धेतून हकालपट्टी अशा प्रकारच्या कारवाईंचा यात समावेश आहे. अर्थात, संयोजक समितीच्या नियमातून खेळाडूंची केवळ टोकियोत की भविष्यातील प्रत्येक ऑलिंपिक स्पर्धा सहभागावर बंदी येणार या विषयी स्पष्ट उल्लेख नाही. त्याचबरोबर कुठला नियम मोडला की काय शिक्षा याचा देखिल स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही.

जपानमधील कोविडची भिती अजून संपलेली नाही. तेथील आणिबाणी देखिल पूर्णपणे उठवलेली नाही. त्याचबरोबर स्थानिक प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबतही निर्णय झालेला नाही. परदेशी प्रेक्षकांना यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. खेळाडूंसाठी उभारण्यात आलेले क्रीडा ग्रामचे पूर्ण लशीकरण करण्यात येणार असून, जपानी नागरिकांना त्यापासून दूर ठेवण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या खेळाडूंना जपानमध्ये प्रवेश करताना लसीकरण झाल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. आशिया आणि आफ्रिकेतील खेळाडू लस घेण्यासाठी कतारला जाणार असून, दक्षिण अमेरिकेतील खेळाडू मायामी आणि ह्युस्टनचा मार्ग पत्करणार आहेत.