कोरोना हाताळणीत भारतीय ‘नेतृत्व’ अपयशी

0
367

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – मागील वर्षापासून जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. जागतिक महासत्ता असलेला अमेरिका देश देखील या महामारीतून स्वत:ला वाचवू शकला नाही. युरोपात आता लसीकरण वाढल्यानं कोरोना नियंत्रणात आला आहे. पण भारत आणि ब्राझील या दोन देशात कोरोनाचं संकट वाढतच चाललं आहे. त्यामुळे भारतीय नेतृत्वावर जगभरातून चौफेर टीका होत आहे.

भारत आणि ब्राझीलमधील कोरोना परिस्थिती चिघळत असल्याची स्थिती आहे. या दोन्हा देशांतील राजकीय नेतृत्व कोरोनाला हरवण्यास अपयशी ठरलं असून, त्यांनी तज्ज्ञांकडे दुर्लक्ष केलं आहे. त्याची किंमत आता या दोन्ही देशांना मोजावी लागत आहे, असा आरोप प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक ‘नेचर जर्नल’ने आपल्या संपादकीय लेखात केला आहे. या दोन्ही देशातील कोरोना संकट हे राजकीय अपयशामुळे आलेले संकट असल्याचं देखील म्हटलं आहे.

कोरोनामुळे लाखो लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम झाला आहे. या लेखात ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सनारो यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. बोल्सनारो यांनी कोरोनाच्या आजाराला एक किरकोळ ताप असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी मास्क आणि सोशल डिस्ट्न्सिंग सारख्या वैज्ञानिक सल्ल्याला देखील मान्य करण्यास नकार दिला होता.

दरम्यान, भारतातील राजकीय नेतृत्वाने आवश्यकतेनुसार काम केलं नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोरोना महासाथीच्या काळात लोकांना एकत्र येण्यासाठी परवानगी देण्यात आली. काही प्रकरणांत अधिकाधिक गर्दी जमवण्यासाठीच नेत्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. त्यामुळे भारतात कोरोना वाढला आहे, असं या वैद्यकीय नियतकालिकात म्हटलं आहे.