कोरोना मृत्यांच्या नातेवाईकांचे आर्थिक मदतीचे तब्ब्ल “इतके” अर्ज बाद

0
266

पिंपरी, दि. 5 (पीसीबी) – कोरोनामुळे शहरातील अनेक कुटुंबातील कर्त्या माणसाचा मृत्यू झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्यांना सावरण्यासाठी मदत व्हावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने 50 हजार रुपयांची अर्थिक मदत घोषित करण्यात आली; मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे याबाबतच्या आलेल्या 6 हजार 59 अर्जांपैकी तब्बल 640 अर्ज बाद झाल्याचे समोर आले. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा प्रशासनाने केला. त्यामुळे हे नागरिक मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या निकटतम नातेवाईकांस 50 हजार रुपये इतका सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्याबाबतचे अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया डिसेंबर महिन्यापासून सुरू झाली. मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यात जमा करण्याकरिता ही योजना तयार केली आहे.

त्यानुसार मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी राज्य शासनाने विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचे होते. पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत यासाठी 6 हजार 59 मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी अर्ज केले होते. त्यापैकी 640 जणांचे अर्ज बाद झाले असल्याचे समोर आले आहे. कागदपत्रांमध्ये झालेली चूक व आधार कार्ड नंबर चुकल्याने अर्ज बाद झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

याबाबत वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ”महापालिका व ग्रामीण भागातून 6059 अर्ज करण्यात आले आहेत. त्यापैकी 640 अर्ज बाद झाले आहेत. ज्यांचे अर्ज बाद झाले आहेत, त्यांना प्रत्यक्ष एक तारीख देऊन बोलवण्यात येणार आहे. त्यासाठी पाच जणांची कमिटी स्थापन करण्यात येईल. एकही नातेवाईक यापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे”.