कोरोना जनजागृती करून गणपती विसर्जन

0
275

पिंपरी,दि.२(पीसीबी) – पर्यावरणाविषयी भान ठेवून चिंचवड गावातील गांधी पेठ तालीम मित्रमंडळाने आपल्या गणपतीचे विसर्जन मंगळवार, दिनांक ०१ सप्टेंबर २०२० रोजी मंडळाच्या प्रांगणात गणेशकुंड निर्माण करून त्या हौदात केले. विसर्जन आरतीचा मान लोकमान्य हॉस्पिटल कोविड-१९ विभागप्रमुख डॉ. जयवंत श्रीखंडे यांना देण्यात आला होता; तसेच माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे, ॲड. संजय भळगट, चंद्रकांत देव, मकरंद बेलसरे, गांधी पेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, उत्सवप्रमुख विपुल नेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यापूर्वी डॉ. जयवंत श्रीखंडे यांनी ‘कोरोनाचा सामना करताना घ्यावयाची काळजी’ या विषयावर उपस्थित कार्यकर्त्यांना सुलभ भाषाशैलीत मार्गदर्शन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेशाची प्रतिष्ठापना ते विसर्जनादरम्यानचे सर्व कार्यक्रम हे सोशल डिस्टंन्सिगचे काटेकोर पालन करून आणि संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून करण्यात आले.