कोरोना आटोक्यात येणार असेल तर मंदिर भूमिपूजन आवश्य करा – शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

0
296

सोलापूर, दि. १९ (पीसीबी) – अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला ५ ऑगस्ट रोजी सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन पार पडणार आहे. दरम्यान, दुसरीकडे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. “राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा,” असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

कोरोना विषाणू फैलावाच्या परिस्थिती व सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पवार रविवारी सोलापुरात आले होते. आढावा बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी कोरोना संकटाच्या मुद्यावर मोदी सरकारला चिमटे काढले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे उपस्थित होते.

पवार म्हणाले, “करोना हे देशावरचे मोठे संकट आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आले पाहिजे. एकमेकांशी योग्य समन्वय साधून काम झाले पाहिजे. कोरोनाचे भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे प्राधान्याने ठरविले पाहिजे. परंतू, मंदिर बांधून कोरोनाचं संकट दूर होईल, असं काही मंडळींना वाटतं आहे. राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त करोनाचं संकट दूर व्हावं हीच आमची इच्छा आहे.”
कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी देशात टाळेबंदी लादली गेली आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्याकडे राज्य व केंद्र सरकारने अधिक गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची सूचनाही पवार यांनी यावेळी केली.