कोरोनामुळे शिक्षणावर काय परिणाम झाला ?

0
823

 

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – सध्या देशात तसंच जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. करोना विषाणू आणि लॉकडाउनचा फटका विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे देशातील २७.५ कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. युनिसेफकडून तयार करण्यात आलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आशिया क्षेत्रात तब्बल ६० कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर करोना आणि लॉकडाउनचा परिणाम झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मुलांमधील शिक्षण आणि शिक्षणाच्या दृष्टीकोनाकडे लक्ष वेधत संयुक्त राष्ट्राच्या अहवालात असे म्हटले आहे की, “प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या २४.७ कोटी विद्यार्थ्यांचं शिक्षणावर शाळा बंद असल्यामुळे परिणाम झाला आहे. याव्यतिरिक्त अंगणवाडी केंद्रातील बालवाडीत शिकत असलेल्या २.८ कोटी विद्यार्थ्यांवरदेखील याचा परिणाम झाला आहे.”

भारताच्या प्रयत्नांची चर्चा

तथापि, या अहवालात केंद्र व राज्य सरकारांनी वेब पोर्टल्स, मोबाईल अ‍ॅप्स, टिव्ही चॅनेल्स, रेडिओ आणि पॉडकास्ट यासारख्या अनेक ई-प्लॅटफॉर्मवरुन मुलांपर्यंत शिक्षण मिळवून देण्यासाठी मुलांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांकडेही लक्ष दिलं आहे.

२४ टक्के घरांमध्ये इंटरनेट

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर नुकतेच नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) पहिली ते १२ वी साठी पर्यायी शैक्षणिक कॅलेंडर तयार केले आहे. यामध्ये त्यांनी घरातून अभ्यास करण्याचा पर्याय सुचवला आहे. युनिसेफच्या अहवालात अहवालात म्हटले आहे की, भारतातील जवळपास एक चतुर्थांश कुटुंबांकडे (२४ टक्के) इंटरनेटचा वापर केला जात आहे.

चार कोटींपेक्षा अधिक मुलं कुपोषित

दरम्यान, मोठ्या संख्येने मुलांच्या शिकण्याच्या संधींमध्ये घट होण्याची शक्यतादेखील अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. “भारतात पाच वर्षांखालील जवळपास दोन कोटी मुलांवर परिणाम होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तसंच ४ कोटींपेक्षा अधिक मुलं कुपोषित आहेत आणि १५ ते ४९ वयोगटातील निम्म्याहून अधिक भारतीय स्त्रिया अशक्त आहेत, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.