कोरोनाचे संकट ‘असे’ होणार कमी

0
256

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) : कोरोना महामारीने गेल्या काही महिन्यात थैमान घातलं होतं. त्यामुळे देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम जलद गतीनं राबवण्यात आली होती. आतापर्यंत देशात करोडो लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. या लसीकरणामुळे आता कोरोना रूग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. त्यातच आता आणखी एक लस भारतात लवकरच उपलब्ध होऊ शकते.

कोवाॅक्स प्रोग्राॅमच्या माध्यमातून आता भारताला माॅडर्ना लसीचे 75 लाख डोस देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. WHOच्या रिजनल डायरेक्टर डाॅ. पुनम सिंग यांनी याबद्दल माहिती दिली. जगभरात कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट सर्वाधिक घातक आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आतापर्यंत 100हून अधिक देशांमध्ये हा व्हेरियंट पसरल्याचं डाॅ. पुनम सिंग यांनी सांगितलं आहे.

ज्या लोकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत, अशा लोकांमध्ये डेल्टा व्हेरियंटचा धोका कमी असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी दिली होती. त्यामुळे भारतात देखील लसीकरण प्रकिया लवकरात लवकर पुर्ण व्हावी, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, सध्या भारतात कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक वी या तीन लसींच्या वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर काही दिवसांपुर्वी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने माॅडर्ना लसीला देखील आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. देशात कोरोना नियंत्रणासाठी सरकार माॅडर्नासोबत सकारात्मकतेनं काम करत असल्याचं नीती आयोगाचे सदस्य डाॅ. वी. के. पाॅल यांनी सांगितलं होतं.