कोयत्याने वार करून लुटल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

0
731

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – रस्त्याने जाणा-या तरुणांना अडवून त्यांना कोयत्याने मारहाण करून त्यांच्याकडील मोबईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.11) पहाटे चार वाजता ममता नगर जुनी सांगवी येथे घडली.

एम एच 12 / बी ई 2449 या दुचाकीवरून आलेल्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौकी न्युमी, वेंगवोर होरम अशी जखमी तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी जखमी तरुणांचा रूम पार्टनर जॉर्ज सॅम्युल नागा (वय 24, रा. ममता नगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे चारच्या सुमरास फिर्यादी जॉर्ज आणि त्यांचे जखमी मित्र फिरायला गेले होते. ते ममता नगर येथील बालयोगी आश्रमासमोर आले असता तीन तरुण एम एच 12 / बी ई 2449 या दुचाकीवरून आले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना रस्त्यात थांबवले. एका आरोपीने पौकी यांच्या हातावर तर वेंगवोर यांच्या पाठीवर कोयत्याने मारून जखमी केले.

त्यानंतर आरोपींनी वेंगवोर यांच्या खिशातून मोबईल फोन जबरदस्तीने काढून घेतला आणि ममता नगर जुनी सांगवी या दिशेने चोरते पळून गेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.