कोथरूड परिसरात पकडलेल्या रानगव्याचा अखेर मृत्यू

0
334

पुणे,दि.०९(पीसीबी) – पुण्यातील कोथरुड येथे घुसलेल्या रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रानगव्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं होतं. जवळपास पाच तासांच्या धावपळीनंतर गव्यावर नियंत्रण मिळवण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलं होतं. पण यावेळी रानगवा जखमी झाला होता. त्याच्या तोंडातून रक्त वाहत होतं. अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

“कोथरूड भागात आज सकाळच्या सुमारास रानगवा नागरिकांना दिसून आल्यानंतर आम्हाला याबाबत माहिती देण्यात आली. आम्ही काही वेळात घटनास्थळी पोहचलो. त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे रानगवा बिथरला. डार्ट मारल्यानंतर त्याची धावाधाव झाल्यामुळे घाबरून मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. पण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण समजू शकणार आहे,” अशी माहिती वन अधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे.

पुण्यामधील कोथरुड भागातील महात्मा सोसायटीमधील नागरिकांसाठी आजची सकाळ आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. या सोसायटीमध्ये सकाळच्या सुमारास रानगवा दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. गव्याला पकडताना वन खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.