“कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही”:

0
411

मुंबई, दि.१२ (पीसीबी) : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. आज आमदार नितेश राणे यांनीही आंदोलकांची भेट घेत ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही नितेश राणे यांनी निशाणा साधलाय. याबाबत अनिल परब यांना विचारलं असता, कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही, असं प्रत्युत्तर परब यांनी दिलं आहे.

नितेश राणे यांचे आरोप आम्ही मोजतच नाही. कोण नितेश राणे? त्यांची मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची पात्रता आहे का? त्यामुळे त्यांच्या आरोपांना आम्ही महत्व देत नाही, असं अनिल परब म्हणाले. तसंच कालपर्यंत 2 हजार एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. यापुढे ही कारवाई अधिक कडक करु. एसटी कर्मचाऱ्यांचं कधीही न भरुन येणारं हे नुकसान गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत भरुन देणार का? असा सवालही अनिल परब यांनी केलाय.

अनेक कर्मचारी कामावर येत आहेत. काल सांगितलं होतं की कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण दिलं जाईल आणि जे अडवणूक करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कर्मचाऱ्यांनी एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या कमिटीसमोर जावं आणि म्हणणं मांडावं. 12 आठवड्याच्या कालावधीत समितीचा जो अहवाल येईल तो आम्हाला आणि कर्मचाऱ्यांनाही मान्य असेल. आपण कामावर जा, कामावर गेलात तर आपलं नुकसान होणार नाही. राजकीय पक्ष राजकीय पोळ्या भाजतील, पण नुकसान आपल्याला सहन करावं लागेल, असं आवाहनही परब यांनी केलं.

एसटीच्या विलिनीकरणाचा विषय उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर हे संपकऱ्यांना भडकावण्याचं काम करत आहेत. कर्मचाऱ्यांची जबाबदारी घ्यायला ते तयार नाहीत. कामगारांनी सदसद्विवेकबुद्धीने विचार करावा. कोरोना काळात एसटीचं मोठं नुकसान झालं आहे. आता संपकऱ्यांनी एसटी पुन्हा खड्ड्यात जाईल असं काही करु नये, असंही परब म्हणाले.

शरद पवार यांच्या एका व्हिडीओबाबत पत्रकारांनी विचारलं असता, पवारांचा व्हिडीओ मी पाहिलेला नाही. विलिनीकरण्याची मागणी दोन-तीन वा चार दिवसांत मान्य होऊ शकत नाही. समितीचा अहवाल आल्याशिवाय त्यावर निर्णय होऊ शकत नाही. पगाराबाबत काही मागण्या आहेत त्यावर चर्चा होऊ शकते. हायकोर्टाच्या निर्णयानुसार कमिटीच विषय हाताळेल आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असं परब यांनी स्पष्ट केलंय. तसंच माझ्यावर काय आरोप करायचे ते करा, पण कामगारांचं नुकसान करु नका. आज जे काही सुरु आहे त्यातून कामगारांचं नुकसान होत आहे. त्यांनाही माहिती आहे की आपण चुकीची मागणी लावून धरली आहे, असंही परब म्हणाले.