केंद्र सरकार विरोधात माकपची आकुर्डीत निदर्शने

0
233

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – केंद्र सरकारने नागरिकांच्या आर्थिक समस्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी करत विविध प्रश्नांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आकुर्डीतील शहीद दत्ता पाडळे पुतळा येथे निदर्शने केली. सर्व प्रकारच्या कर्ज वसुलीसाठी मार्च 2021 पर्यंत वाढ देण्यात यावी तसेच पुढील सहा महिने प्रत्येकाच्या खात्यावर 7,500 हजार अनुदान जमा करावे व प्रत्येक घरात प्रत्येकाला 10 किलो धान्य वितरित करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. विविध मागण्यांचे पत्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

सर्व प्रकारची कर्ज वसुली थांबवून, कर्ज वसुलीला मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ द्यावी. आयकर न भरणाऱ्या नागरिकांना रेशनवर अन्नधान्य वितरण करावे, तसेच पुढील सहा महिने प्रत्येकाच्या खात्यावर 7,500 अनुदान जमा करून माणसी 10 किलो धान्य वितरित करावे. संघटना स्वातंत्र्य आणि संपावर बंदी घालणाऱ्या नवी लेबर कायदे रद्द करावे. जॅाब्ज फॅार ऑल, जॅाब्ज फॅार लाईफ या धोरणाची अमलबजावणी करावी. लघु आणि मध्यम उद्योगांना विद्युत पुरवठ्याचे सातत्य ठेऊन 6 रु युनिट पेक्षा जास्त नाही असा वीज आकार ठेवा, तसेच इंधन आकार, स्थिर आकार, इंधन अधिभार रद्द करा, घरगुती 200 युनिट पर्यंतचे मासिक वीजबिल माफ करा. सार्वजनिक आरोग्यसेवेसाठी वार्षिक बजेट मधून 18 टक्के रक्कम खर्च करा. शिक्षणाचे खासगीकरण रद्द करा, 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी शुल्क माफ करा. कार्पोरेट आणि सरकारी उद्योगामधील कंत्राटी कर्मचारी पद्धत रद्द करा आदी मागण्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केल्या आहेत.

यावेळी क्रांतिकुमार कडुलकर, सतीश नायर, अपर्णा दराडे, गणेश दराडे, सचिन देसाई, बाळासाहेब घस्ते, विनोद चव्हाण, अमिन शेख, अविनाश लाटकर, रंजिता लाटकर, किसन शेवते, शामल ओव्हाळ, नयना आवटे, आशा बर्डे, सतीश मालुसरे, माधव गायकवाड, शेहनाज शेख, रंजीता लाटकर, मंगल डोळस, निर्मला येवले, सुषमा इंगोले, निर्मला येवले, मनीषा सपकाळे, ज्योती मूलमूले, गोदावरी गायकवाड आदी कार्यकर्त्यानी आकुर्डी येथे निदर्शने केली.