केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने

0
277

पिंपरी, दि. 26 (पीसीबी) : केंद्रातील मोदी सरकारला 7 वर्षे पूर्ण होऊनही श्रमिक, उपेक्षित वर्गाच्या हालअपेष्टा संपलेल्या नाहीत, असा आरोप करत ‘माकप’ने आज (बुधवारी) केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शाखेने आकुर्डी येथे ही निदर्शने केली. क्रांतिकुमार कडुलकर, गणेश दराडे, सतीश नायर, अपर्णा दराडे, सचिन देसाई, विनोद चव्हाण, देविदास जाधव, विनोद चव्हाण, अविनाश लाटकर, अमिन शेख, अमोल जगताप यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

क्रांतिकुमार कडुलकर म्हणाले, “शेतकरी, कामगार विरोधी कायद्यामुळे देशातील बहुसंख्य वर्ग दारिद्र्य रेषेखाली लोटला गेला आहे. 2020 पासूनच्या कोरोना महामारीमध्ये केंद्र सरकारची संपूर्ण आरोग्य सेवा कोसळली. लाखो गरीब लोक ऑक्सिजन,जीवरक्षक औषधे, इंजेक्शन अभावी मृत्यूमुखी पडले. श्रमिकांना न्याय देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. कोरोना महामारी आर्थिक संकटात इन्कमटॅक्स न भरणाऱ्या कुटुंबाना दरमहा 7500 रुपये अनुदान,  रेशन दुकानामार्फत 13 जीवनावश्यक वस्तू वितरित कराव्यात. असुरक्षित,असंघटित,कंत्राटी कामगारांना किमान 21 हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे, या प्रमुख मागणीकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. सरकारच्या जनविरोधी नीतीचा निदर्शने करून निषेध केला आहे”.